नाशिक : महापालिकेच्या ई-कनेक्ट अॅपवर आत्तापर्यंत दाखल तक्रारींचे ९९ टक्के निराकरण झाले आहे. कोणत्याही तक्रारींवर महापालिका जलद कारवाई करते, परंतु तरीही नागरिकांची भूमिका सकारात्मक नसते. त्याचे प्रतिबिंब अॅपमधील स्टार रेटिंगमध्ये दिसतेच, शिवाय स्वच्छ सर्वेक्षणात फटका बसतो. यामुळे नाशिककर नाराज का याचा शोध प्रशासन घेणार असून, त्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात प्रतिसाद अर्ज ठेवून नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात गेल्यावर्षी महापालिकेला फीड बॅॅक बरोबर नसल्याने मोठा फटका बसला आणि देशात ६३ वा क्रमांक आला. यंदाच्या वर्षीदेखील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद किंवा महापालिकेविषयीचे अनुकूल मत नोंदवले न गेल्याने पुन्हा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक घसरला आणि ६७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी महापालिकेने ई-कनेक्ट अॅप अत्यंत सक्षमतेने बनवले असून, त्यावरील तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते. आत्तापर्यंत ३७ हजार तक्रारी या अॅपवर आल्या आहेत. त्यातील ९९.६९ टक्के तक्रारींचे निराकरण झाले असून, दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीत सोडविल्या न गेलेल्या केवळ तक्रारी प्रलंबित आहेत. परंतु अॅपवर तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर त्यावर महापालिकेची कार्यवाही कशी वाटली यासाठी पाच स्टार मिळणे अपेक्षित असताना इतके स्टार मिळत नाही. त्यामुळे आत्तापर्यंत सरासरी तीन स्टारच महापालिकेला मिळत आहेत.महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिक सकारात्मक झाले आणि त्याची नोंद स्वच्छ सर्वेक्षण किंवा अन्य वेळी झाली तर त्याचा फायदा कामगिरी सुधारण्यास होऊ शकतो. परंतु अन्य शहरांच्या तुलनेत महापालिका सक्रिय असताना आणि चांगल्या सेवा असतानादेखील पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिककरांची मनोभूमिका समजावून घेण्यासाठी विभागीय कार्यालयात प्रतिसादाचे अर्ज ठेवण्याची तयारी केली आहे.महापालिकेत कामकाजासाठी नागरिक आल्यानंतर त्यांचे जेव्हा काम होईल तेव्हा त्यांना फिडबॅक फॉर्म देऊन मत जाणून घेण्यात येणार असून, त्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्यात येणार आहेत.सेवाभावी संस्थांची मदत घेणारप्रतिसाद अर्ज भरून घेण्यासाठी सेवाभावी संस्था किंवा महाविद्यालयीन युवक, एनएसएसचे युवक यांची मदत घेतली जाऊ शकते. त्यांनी विभागीय कार्यालयात प्रतिसाद अर्ज भरून बॉक्समध्ये टाकले तरी त्यावरून महापालिका विश्लेषण करून कामाची दिशा ठरवू शकेल, असे राधाकृष्ण गमे यांचे म्हणणे आहे.
नाशिककर महापालिकेवर नाराज का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:44 AM