येवला : तालुक्यातील पालखेड पाटबंधारे डावा कालवा विभागाच्या वितरीकांवरील एरंडगाव, धुळगाव परिसरातील लाभधारक पाणी वापर सहकारी संस्थांना त्यांच्या कोट्याचे पाणी न मिळाल्याने या वितरिकांवरील लाभधारक शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी ३ वाजता अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी तत्काळ अटकाव केल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा संबधितांना देऊनही एकही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता.एरंडगाव, धुळगाव येथील सिद्धेश्वर व दहेगाव शिवारातील सप्तशृंगी पाणीवापर संस्थेला आवर्तनाचे पाणीच दिले नाही. जे पाणी दिले ते फक्त धनदांडग्यांचे शेततळे भरून देण्यासाठी दिले. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे नाही अशा शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. अचानक तुमचा कोटा संपला, असे जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता जी. आर. काकुळते यांनी जाहीर केल्यानंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी न मिळाल्यास वितरिका क्र मांक ३३ च्या गेटवरच आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित अधिकारी व तालुका पोलिसांना पत्राद्वारे मंगळवारी दुपारी १२ वाजता दिला होता. दहेगाव, एरंडगाव व धुळगाव येथील शेकडो आंदोलक वितरिका क्र मांक ३३ च्या गेटवर दुपारी ३ वाजता एकत्र आले. मात्र कालव्याचे पाणी पालखेड येथूनच बंद झाल्याने व शिल्लक पाणी पाटोदा येथील साठवण तलावात वळविल्याने कालवाच कोरडा झाल्याचे पाहून आंदोलनकर्ते उग्र झाले. सिताराम गायकवाड, बाळू शिंदे, बाळू शेळके, वसंत गायकवाड यांनी सोबत डब्यामध्ये आनलेले रॉकेल अंगावर ओतुन घेतआत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आप्पासाहेब गायकवाड व इतर उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या शेतकऱ्यांच्या हातातील रॉकेलचा डबा हिसकावत त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले. तहसील , पोलीस व जलिसंचन विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलाच नाही. या आंदोलनात बाळासाहेब साताळकर, अप्पासाहेब गायकवाड, सिताराम गायकवाड, सचिन दोंडे, अनिल साताळकर, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड आदि सहभागी झाले होते. वितरिका क्रमांक ३४ वरीलही पाणी वापर सह. संस्थांना पाणी न देताच अधिकाऱ्यांनी संस्थेच्या पाणी कोटा संपला असे जाहीर केल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. (वार्ताहर)
संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: March 08, 2017 1:31 AM