वावी : वावीसह परिसरातील फुलेनगर, दुसंगवाडी, पांगरी, कहांडळवाडी, घोटेवाडी आदी गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत कामकाजाबद्दल तीव्र निषेध केला.
गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्यासंदर्भात समस्या वाढल्या असून, वारंवार मागणी करुनही त्या सोडविल्या जात नाहीत. तसेच वीजबिले थकल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांसह रहिवाशांची पिळवणूक केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला असल्याचे दिसून आहे.
मोर्चाने आलेल्या शेतकऱ्यांनी नंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. सुमारे साडेचार तास ठिय्या आंदोलन सुरु होते. नाशिक येथून आंदोलनस्थळी आलेल्या कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक शाखा अभियंता हे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांची पूर्तता करीत नाहीत. तसेच समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावाही करीत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला. वीज अधिकाऱ्यांनी समस्या सोडविल्या नाहीत तर सिन्नर - शिर्डी महामार्गावर जाऊन ठिय्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी जळालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सहाय्यक शाखा अभियंता अजय सावळे यांच्याकडे पाठपुरावा चालवला होता. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्याने शेतकरी संतप्त झाले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी घेतली होती.
यावेळी माजी सरपंच विजय काटे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संतोष जोशी, पंचायत समिती सदस्य रवी पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बाबासाहेब पगार, सुनील पवार, दीपक वेलजाळी, हौशीराम घोटेकर, कानिफनाथ घोटेकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
इन्फो
डोंगरे यांनी दिले आश्वासन
वीज वितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. संतप्त शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही देत कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याचा आग्रह केला.