शिवाजी चाैक परिसरातील अथर्व हडकुळे, गणेश सद्गुरू, अनुप मालपाणी व सागर गायकवाड या मुलांना पिसाळलेल्या श्वानाने चावे घेऊन जखमी केले. यामध्ये अथर्व हडकुळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पिसाळलेल्या श्वानाने या मुलांसह गाय व दुसऱ्या श्वानांनाही चावा घेतला. नागरिकांनी याबाबत दूरध्वनीद्वारे नगर परिषद प्रशासनाशी संपर्क केला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर संतप्त जमावाने या श्वानाला ठार मारले. भटक्या श्वानांना पकडण्यासाठी नगर परिषदेजवळ कुठलीही गाडी किंवा यंत्रणा नाही. जमावाने श्वानाला ठार मारल्यावर नगर परिषदेचे कर्मचारी येऊन त्यास पोत्यात घालून घेऊन गेले. दुसऱ्या शहरातील मोकाट कुत्रे येथे आणून सोडले जातात, असे असतानाही नगर परिषदेकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इन्फो
उपचारासाठी मदतीचे आवाहन
पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या अथर्व हडकुळे याची घरची परिस्थिती हालाखीची असून त्याच्यावरील उपचारासाठी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या मुलाच्या उपचारासाठी नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.