पंचवटी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. सकाळच्या वेळी अनेक मतदार आपले मोबाइल खिशात घेऊन गेले, मात्र त्यांना थेट मुख्य मतदान केंद्राच्या गेटवरच अडविण्यात येऊन मोबाइल काढून ठेवण्यास सांगितल्याने मोबाइल ठेवायचे कोणाकडे असा सवाल मतदारांना पडला. त्यावेळी त्यांनी बंदोबस्तकामी आलेल्या परराज्यातील पोलिसांकडेच मोबाइल स्वाधीन केले असता ‘मोबाइल हमारे पास देना मत, किधर भी रखो हमे क्या’ असे खडे बोल सुनावल्याने संतापाच्या भरात काही मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावता माघारी फिरणे पसंत केले.
एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती मतदान करण्यासाठी गेले असता पोलिसांनी सर्वांनाच मोबाइल देऊ नका असे सांगितले, त्यावेळी काही जणांनी कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल ताब्यात घेतले तर काहींनी पोलिसांकडेच मोबाइल देत आमचे मोबाइल तुम्ही सांभाळा आम्ही मतदान करून येतो अशी विनवणी केली. त्यावर काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदारांचे मोबाइल त्यांच्या ताब्यात घेतले होते, परराज्यातील पोलिसांनी मात्र मोबाइल ताब्यात घेण्यास नकार दिल्याने आपले मोबाइल कोणाकडे ठेवायचे, असा प्रश्न पडला होता. काहींनी तर मोबाइल ठेवण्यासाठी कोणी ओळखीची व्यक्ती मिळत नसल्याने वाहनाच्या डिक्कीत ठेवले, तर काहींनी थेट मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासूनच काढता पाय घेत नियमावलीच्याविरुद्ध नाराजी व्यक्त करत मतदानावर पाणी सोडले. मतदान केंद्रात मोबाइल वापरएकीकडे मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्यात येऊन तसे फलक लावण्यात आले होते, तर दुसरीकडे मात्र मतदान केंद्रातील कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी परराज्यातून आलेले पोलिस बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असल्याचे चित्र दिसत होते. मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांना मोबाईलची मुभा, तर मतदारांना का नाही, असा सवाल संतप्त मतदारांनी यावेळी व्यक्त केला.