नाशिक: बुकी अनिल जयसिंघानी यांचा पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी घरोबा आहे तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनीच जयसिंघानी यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घालून दिली होती. त्यामुळे आता राज्य सरकार जी काही चौकशी करणार आहे, त्यात या सर्व बाबींचीही चौकशी केली जावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
विनायक राऊत सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले असता शालीमार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रविवारी एकनाथ शिंदे यांची खेड येथे झालेल्या सभेत कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिले आणि ते फक्त वाचण्याचे काम करीत होते असेच दिसले आणि त्यामुळेच लोक उठून जात होते असे सांगून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री फक्त भाषणात दंग आहेत. शासकीय विमानाने जाऊन एक तास भाषण करतात. पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांच्याकडे वेळ नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत मग त्यांना मदत कधी करणार असा सवालही राऊत यांनी केला.