दत्ता दिघोळे, नायगाव (नाशिक) - सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभीं येथे बिबट्याच्या हल्ल्यात पशुपालक जखमी झाल्याची घटना शनिवारी (९) सकाळी घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या हिरामण मोरे यांना नाशिक येथिल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
येथील हिरामण त्रंबक मोरे हे आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान आपल्या शेळ्यांसह गाईला गवत आणण्यासाठी शेजारील कातकाडे यांच्या शेताकडे जात होता.यावेळी शेजारच्या सोयाबीनच्या शेतात लपलेल्या बिबट्याने मोरे यांच्यावर हल्ला केला.बिबट्याने अंगावर मारलेल्या झापेमुळे मोरे हे जमिनीवर पडले.मात्र मातीचे क्षेत्र असल्यामुळे त्यांना लागले नाही.मात्र बिबट्याच्या पंजाने खोलवर जखमा झाल्या आहे.मोरे यांनी बचावासाठी घाबरलेल्या अवस्थेत जोरजोरात आरडाओरडा सुरू केला.मोरे यांच्या आवाजाने घरातील सदस्य तसेच शेजारच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन मोरे यांची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली.
दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मोरे यांच्या मानेवर,कानावर तसेच डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहे.जखमी मोरे यांना लक्ष्मण भास्कर व इतर शेतकऱ्यांनी उपचारासाठी नासिक येथिल शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नायगाव,जोगलटेंभी आदी परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे.काही दिवसापुर्वीच जोगलटेंभी येथिल संगिता काळे या शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.मात्र संगिता यांनी मोठ्या धैर्याने बिबट्याची दोन हात करून आपला बचाव केला होता.गेल्या अनेक दिवसांपासुन या परिसरात वाढलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त सिन्नर वनविभागाने करण्याची मागणी पशुपालक व शेतकरी करत आहे.