पंचवटी : भ्रष्टाचारावर आळा बसावा तसेच काळा पैसा बाहेर यावा, यासाठी शासनाने काही दिवसांपासून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम बुधवारच्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाऱ्या जनावरांच्या आठवडे बाजारावरही झाला आहे. बुधवारच्या आठवडे बाजारात जनावरांची होणाऱ्या विक्रीची उलाढाल जवळपास ५० टक्क्यांनी घटली आहे. जनावरे विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी तसेच दुग्ध व्यावसायिकांना खरेदीदाराकडून लागलीच पैसे मिळत नसल्याने खरेदीदाराला मुदत द्यावी लागत आहे. बाजार समितीत सुरुवातीला फळ व पालेभाज्यांचे व्यवहार करणाऱ्या आडते, व्यापारी व शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची नोटाबंदीमुळे अडचण निर्माण झाली होती. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने बाजार समितीत कित्येक दिवस सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली होती. परिणामी बाजार समितीत सुट्या पैशांची अडचण निर्माण झाल्याने सलग तीन ते चार दिवस दुपारचे फळभाज्यांचे व्यवहारदेखील बंद होते. बाजार समितीत दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात जनावरांची खरेदी-विक्री होत असते. गेल्या महिन्यापासून सुट्या पैशांची चणचण निर्माण झाल्याने शेतकरी तसेच दुग्ध व्यावसायिकांना जनावरांची विक्री केल्यानंतर लागलीच पैसे मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे, तर खरेदीदारांनादेखील गायी, म्हशी यासारखी जनावरे खरेदी केल्यानंतर संबंधितांना पैशांचा परतावा करण्यासाठी मुदत मागून घ्यावी लागत आहे. नोटाबंदीनंतर जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्रीची उलाढाल घटली आहे. (वार्ताहर)
जनावरांचा बाजार रोडावला
By admin | Published: December 21, 2016 10:32 PM