पाटोदा : पालखेड कालव्यापासून चारशे फुटावर जमीन.. मुबलक पाणी... शेतात पेरलेला गहूही चांगला... त्यामुळे यंदा खरिपात नाही तर रब्बीत का होईना घरापुरते धान्य होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निसर्गाने निराशा केली. या हतबलतेतूनच ठाणगाव येथील शेतकरी भास्कर नामदेव शेळके यांनी आपल्या उभ्या गव्हाच्या पिकात मेंढ्या तसेच इतर जनावरे सोडत संताप व्यक्त केला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून रोजच हवामानात बदल होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मावा, करपा यासारख्या रोगांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाल्याने पिकांची वाढ खुंटली. दिवसाआड महागडी औषध व कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी निसर्गापुढे पुरता हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील ठाणगाव येथील भास्कर शेळके यांनी आपल्या गट नंबर ५८ मध्ये अडीच एकर क्षेत्रावर दोन महिन्यांपूर्वी गव्हाची पेरणी केली. गव्हाची उगवणही चांगल्या प्रमाणात होऊन वाढही झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हवामानातील सततच्या बदलामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली तसेच पिके पिवळी पडल्याने पिकावर विविध औषधांची फवारणी केली. आज एक औषध फवारणी केली की उद्या लगेच हवामानात बदल झाला. दुसरे औषध फवारावे लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली असे असूनही रोग आटोक्यात येत नसल्याने अगदी हताश होत निर्णय घेऊन गव्हात जनावरे चरण्यासाठी सोडावी लागली.बळीराजा कर्जबाजारी; पिके उद्ध्वस्त होत असल्याने आर्थिक कोंडी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला. अशाही परिस्थितीत सावरत त्याने मोठ्या आशेने रब्बी हंगामाची शेतात पेरणी केली.यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गाने रांगडा तसेच उन्हाळ कांद्याबरोबरच गहू, हरभरा, ज्वारी, मका व भाजीपालापिकाची लागवड केली. गेल्या दोन अडीच महिन्यापासून निसर्गाच्या हटवादीपणामुळे कधी ढगाळ हवामान, तर कधी पावसाळी वातावरण. धुके, कधी मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी व दवामुळे रब्बी हंगामातील पिके विविध रोगाला बळी पडले. मावा व इतर रोगांचे प्रमाण इतके आहे की त्यामुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली असल्याने उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे वाटोळे केले. पाणी असल्याने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित करून शेतात कांदा व गव्हाची लागवड केली. मात्र सतत हवामानात बदल होत असल्याने पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधांची फवारणी केली. मात्र खर्च करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने अगदी नैराशातून गहू पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्या लागल्या. कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- भास्कर शेळके, शेतकरी, ठाणगाव