त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिक भयभीत झाले असून मंगळवारी बिबट्याने १२ बकऱ्यांसह गाय, वासराचा फडशा पाडला. रानातील शेतीचे रक्षण करण्यासाठी झाप बांधुन राहणाºया कुटुंबातील लहान बालके यांच्या जीवितास काही धोका होतो की काय या विचाराने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.गेल्या आठवड्याभरापासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने शिवाजी संतु महाले, सोमनाथ आनंद महाले आदींच्या झापातील गोठ्यात घुसून सुमारे चार बक-या फस्त केल्या. मध्यरात्रीच्या सुमारास जनावरांचा आवाज आल्याने त्यांनी घराबाहेरील गोठ्यात डोकावले असता बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला करु न त्यांना ठार केले होते. इतर जनावरांच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली असल्याचे सोमनाथ महाले यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसापासून या भागात बिबट्याने आपले बस्तान मांडल्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. एवढेच नव्हे तर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. संपुर्ण त्र्यंबक तालुक्यातच बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तीन महिन्यापूर्वी चाको-याच्या इसमावर जीवघेणा हल्ला केला होता. अशा घटना घडण्यापुर्वी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील वावीसह वाघेरा घाटात बिबट्याचे दर्शन घडल्याने पायी चालणारे, रस्त्याने दुचाकी, सायकल घेउन जाण्यास लोक घाबरत आहे. दहशती खाली वावरण्यापेक्षा या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश लहारे, भुत मोखाड्याच्या सरपंच भारती खिरारी, प्रभाकर खिरारी, खरवळचे सरपंच गोकुळ गारे यांनी केली आहे.
वाढोलीत बिबट्याकडून जनावरे फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:29 PM