नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंजनेरीपासून पुढे त्र्यंबकेश्वरपर्यंत मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे येथून मार्गक्रमण करताना हाल होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सुमारे सहा महिन्यांपासून नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पावसामुळे रस्त्याच्या कामात संपूर्णत: अडथळा निर्माण होऊन काम बंद पडले आहे. परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाढ झाली असून, सर्वत्र खड्डे व खडीचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी रस्त्यावरून दोन्ही बाजूने सुरू असलेली वाहतूक व पडलेले खड्डे यामुळे त्र्यंबकची वाट बिकट झाली आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पुढे मार्गस्थ होताना नागरिकांच्या नाकीनव येत आहे. कारण रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून अपघातांमध्ये वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. धो-धो कोसळणारा पाऊस, रस्त्यावर पसरलेले खड्ड्यांचे व अंधाराचे साम्राज्य व बेशिस्तपणे होणारी वाहतूक यामुळे अंजनेरी-त्र्यंबक रस्ता अपघाताचे केंद्रबिंदू बनू पाहत आहे. अर्धवट स्थितीत रेंगाळलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या गलथान कारभारा-विरोधात संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
अंजनेरी-त्र्यंबक रस्ता ‘खड्ड्यात’
By admin | Published: September 11, 2014 10:07 PM