नाशिक : ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यांचे लिखाण हे कल्पनेतील नव्हे तर वास्तवातील होते. त्याच अस्सलपणामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंजीव ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुरोगामी विचार मंच, दलित युवक आंदोलन व धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार वितरण व परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव, दलित युवक आंदोलनाचे सचिन बागडे, पुरोगामी विचार मंचचे अशोक उफाडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. कसबे यांनी सांगितले की, ‘अण्णा भाऊ नेहमीच सामान्य माणसांसाठी लढले, ते महान शाहीर होते. लेखणीतून त्यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले. तुमचं जीवन या व्यवस्थेत बदलणार नाही, त्यामुळे ही व्यवस्था ताब्यात घ्यावी लागेल. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव’ यासाठी समाजातील तरुणांना पुढे यावे लागेल’, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी डॉ. कसबे यांच्या हस्ते सत्यशोधक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक कार्यासाठी भाऊसाहेब सोनवणे, कला व साहित्य क्षेत्रासाठी डॉ. मारोती कसाब, कामगार लढ्यासाठी कॉ. महादेव खुडे, महिला सक्षमीकरणासाठी प्रा. प्रमिला पवार, विद्यार्थी संशोधन विशाल लोमटे यांच्या वतीने त्यांच्या पालकांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ व दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुरवसे यांनी केले.
फोटो ओळी ०७ -सत्यशोधक पुरस्कार
नाशिक : राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रा. प्रमिला पवार यांना देताना डॉ. रावसाहेब कसबे. समवेत डॉ. विशाल जाधव, सचिन बागडे, अशोक उफाडे आदी.