विधानसभा निवडणुकीच्या आधीच ज्यांनी इच्छुक म्हणून राजकीय आखाड्यात उडी घेतली, त्यात अण्णांचे नाव अत्यंत आघाडीवर आहे. अण्णांचा गेल्या वर्षभरापासून संपर्क सुरू असून, आपला संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव आहे, हे दाखविण्याची एकही संधी ते सोडत नाही. त्यांचा सख्खा भाऊ त्यांना जुमानत नाही आणि अण्णांच्याच मतदारसंघात आव्हान देण्याची भाषा करतो हा भाग वेगळा; परंतु तरीही अण्णा सामाईक नेतृत्व असल्याचा दावा करतात. पक्षाकडे आपण इच्छुक आहोत, हे दाखविण्याची एकही संधी ते सोडत नाही. नेत्यांना भेट, पदाधिकाऱ्यांना गाठ असे सर्व प्रकारे अण्णा प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघात तर गुणगौरव सोहळ्यापासून प्रवचन-कीर्तन सोहळेदेखील त्यांनी घेतले; परंतु तरीही उमेदवारी मिळेल याची शाश्वती त्यांना नाही. म्हणून आता अण्णांनी नवा फंडा शोधून काढला असून, आता बल्क मेसेज पाठविण्याचा फंडा सुरू केला आहे; परंतु हा फंडा अत्यंत मनोरंजक ठरला आहे. अण्णा खंबीर आहे. त्यांना उमेदवारी द्या आता इथपर्यंत परंतु अण्णांना उमेदवारी द्या हे सांगण्यासाठी मतदारांना एसएमएसचा त्रास का भो? बरे तर अण्णा ज्या मतदारसंघात लढवणार तेथील मतदारांना ठीक, परंतु अन्य भागांतील मतदारांवर आता एसएमएसचा मारा होऊ लागला आहे. भाजप हा धार्मिक पक्ष आहे म्हणून अण्णा आध्यात्मिक आहेत, त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी ही गळ मतदारांना टाकून काय उपयोग, भाजपला करा ना...! एसएमएसने त्रस्त एका मतदाराने संताप व्यक्त केला.
अण्णा गुरु? मग, राजकीय आखाड्यात कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:05 AM