नाशिक : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासूनच्या ज्योतिष विषयातील दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास (एम.ए. ज्योतिष) विरोध केला असून, विद्यापीठाने अभ्यासक्रम तत्काळ मागे घेण्याची मागणी समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध करीत इग्नूसारखे नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तरुणाईला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी असल्याचा आरोप केला आहे. शिक्षणातून शहाणपणा येतो असा अंनिसचा ठाम विश्वास आहे. मात्र, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या इग्नूसारख्या विद्यापीठातून समाजाला अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत ढकलणारे शिक्षण देणे ही सरकारची प्रतिगामी कृती असल्याची टीकाही त्यांनी या प्रसिद्धिपत्रातून केली आहे. जागतिक पातळीवर ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार नाही. असा आधार नसणारा गैरलागू आणि विसंगत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करू नये, असे आवाहन करतानाच कोरोनाने निर्माण केलेली बेरोजगारी आणि आर्थिक विवंचना यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईमध्ये अवैज्ञानिक भाकडकथा रुजविण्याचा प्रयत्न करणारा अभ्यासक्रम विद्यापीठाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.