नाशिक- फ्रान्स मध्ये तयार झालेल्या राफेल या लढावू विमानाचा ताबा घेताना संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी त्याठिकाणी नारळ आणि लिंबाचा वापर केला. त्यावरून त्यांचे कर्मकांड सोशल मिडीयावर ट्रोल होत असताना नाशिकमध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने देखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
फ्रान्स येथे राफेल ताब्यात घेण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांंनी विमानाच्या चाकाखाली लिंबू तसेच नारळ ठेवले. लिंबू हे भरपूर क जीवनसत्व असलेले फळ आहे तर नारळ हे भरपूर स्निग्धता असलेले फळ आहे. याशिवाय अन्य काही अवैज्ञानिक आणि अंधश्रध्दायुक्त कर्मकांड देखील त्यांनी केले. भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्येक नागरीकाने अंंगिकारावा त्याचा प्रचार प्रसार करावा असे मुलभूत कर्तव्य जाणिवपूर्वक नमूद केले आहे मात्र देशाच्या संरक्षण मंत्र्यांनीच त्याच्या विसंगत विधान केल्याने नागरीकांच्या अंधश्रध्दा बळकट होणार आहे, असे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने नमुद केले आहे.
या वैज्ञानिक व अंधश्रध्दा युक्त घटनेने सा-या जगापुढे भारताचे हसे झाले आहे. त्यामुळे या कर्मकांडाबद्दल अनिंस निषेध करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समितीचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश इंदवे, प्रधान सचिव अॅड. समिर शिंदे, बुवाबाजी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.