देवगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हात - पाय बांधून करण्यात येणारी अघोरी पूजा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात यश आले आहे. निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला. पीडित हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानांच्या ठिकाणी ठेवले. इतकेच नव्हे तर पायात लोखंडी बेडीही घातली. परंतु फरक काही पडत नव्हता. शिरवाडे (वाकद) येथील एका भगताने त्यांना अघोरी पूजा करण्यास सांगितली. त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्याचे ठरविण्यात आले.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत हे मोर्विस येथे आले. नदीकाठी रहदारीपासून दूर एकांतात सर्व जमा झाले. गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा भयानक प्रकार समोर आला. मोर्विसचे पोलीसपाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून याची माहिती दिली. कृष्णा चांदगुडे यांनी हा जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. पीडितास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पूजेपेक्षा डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी पीडितास दोरातून मुक्त केले व स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली तसेच संबंधित भगतावर कारवाई करण्याची मागणी केली. गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी पूजेचा प्रयत्न फसला आहे.
कोट
"शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते. त्यामुळे रुग्णास बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही. त्याला मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते. अशा घटनांत अंनिसकडून समुपदेशन केले जाते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी अंनिसशी संपर्क साधावा.
- कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.