नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या दिनानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कर्नावट कुटुंबीयांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला.श्री मुनीसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारपासून महापूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. शनिवारी सकाळी मंदिरापासून परिसरात ध्वजाची बॅँड पथकासह शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये ध्वज व श्री मुनीसुव्रत स्वामींची विधीवत महापूजा करण्यात आली. दुपारी नितीन कर्नावट, सविता कर्नावट, मोहित, उनित कर्नावट, कुमारी करिश्मा यांच्या हस्ते मंदिराच्या कलशावर ध्वज चढविण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री मुनीसुव्रत स्वामींचा जयजयकार करत फुलांची उधळण केली.यावेळी प. पू. मुक्तिभूषणजी म.सा., प.पू. मैत्रीभूषणजी म.सा., प.पू. धैर्यभूषणजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनात क्रोध, मान, माया, लोभ यांचा त्याग करावा, असे आवाहन केले. त्यानंतर भजन, कीर्तन होऊन जैन भवनमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य दिनेश पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
आर्टिलरी सेंटररोड येथील जैन मंदिराचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:55 AM