नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता खाली बसला. अखेरच्या दिवशी उमेदवारांनी प्रचार रॅलीऐवजी घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले. येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) च्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ६ एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. पोटनिवडणुकीत मनसेच्या वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरिष लोणारी तसेच राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार माजी नगरसेवक रंजना पवार यांच्यासह ८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यातील एक अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी सेना उमेदवाराला समर्थन दिले असले तरी मतपत्रिकेत त्यांचे नाव असणार आहे. बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. त्यामुळे उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटपावर भर दिला. यावेळी मतदारांना मतदानाचे आवाहन करतानाच अनेकांना मतदान केंद्राचीही माहिती देण्यात येत होती. दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रभागात ६१ बूथ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी २५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांनी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.५) सकाळी मतदान कर्मचाºयांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. दि. ७ रोजी स. १० वाजेपासून गंगापूररोडवरील सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.चुरस वाढलीपोटनिवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मनसे, सेना व भाजपा या तिघा उमेदवारांमध्येच होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चुरस वाढली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीतही त्यांच्या कन्या स्नेहल यांनी उमेदवारी केली होती परंतु, त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता शिवसेनेने मनसे आणि भाजपा उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीच्या प्रचाराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:52 AM