नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या करण्यात येणार आहे. दरवर्षी संमेलनाध्यक्ष निवडीची विशिष्ट प्रक्रिया साहित्य महामंडळाने निश्चित केली आहे. त्यात माजी संमेलनाध्यक्ष यांच्याकडून एक नाव सुचवले जाते, तर नाशिकच्या निमंत्रक संस्थेकडूनदेखील एक नाव सुचवले जाते. त्याशिवाय महामंडळाच्या देशभरातील १० संस्थांकडून संमेलनाध्यक्ष निवडीबाबत त्या भागातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या नावाची निवड करण्यात येते. ही सर्व नावे विशिष्ट कालावधीत बंद लिफाफ्यातून महामंडळाकडे येत असतात. या सर्व संस्था वेगवेगळी नावे सुचवू शकतात किंवा काही संस्था सारखीच नावे सुचवू शकतात. या सर्व नावांचे लिफाफे साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वांसमक्ष उघडले जातात. हीच महामंडळाची निर्धारित पद्धत असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. या पद्धतीनुसारच यंदादेखील महामंडळाच्या सर्व विभागीय शाखांकडून नावे मागविण्यात आलेली आहेत. ती नावे २१ तारखेपर्यंत नाशिकला पोहोचतील. त्यानंतर २३ तारखेला साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात सर्व नावांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात येईल. त्यातून सर्वोत्तम साहित्यिकाच्या नावाची निवड करून त्याची घोषणा नाशिकमध्येच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. ऐनवेळी कलाटणीचीही परंपरा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदांबाबत ज्या नावांची चर्चा होते, तसेच जी नावे प्रचंड चर्चेत असतात त्या नावांचा केवळ उल्लेख करून त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचीदेखील महामंडळाची परंपरा आहे. त्यामुळे जे नाव एखाद्याच विभागीय कार्यालयाने सुचविलेले असते, त्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाते किंवा निमंत्रक संस्थेने सुचविलेल्या नावावरही पसंतीची मोहोर उठविली जाते. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात महामंडळ चर्चेतील नावाला पसंती देते की, सोयीस्कर कलाटणीची परंपरा पाळली जाते, हे पाहणेदेखील औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
अध्यक्षपदाची घोषणाही नाशिकमध्येच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:13 AM
नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देनाट्यसंमेलन : २३ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत निवडीवर चर्चा