नाशिक : नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, अभिनय, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, बालरंगभूमी, लोककलावंत व सांस्कृतिक पत्रकारिता अशा उल्लेखनीय योगदानासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘रंगभूमी दिन २०१८’ पुरस्कारांची घोषणा रविवारी (दि.४) पत्रकार परिषदेत करण्यात आली. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीदिनी महापालिकेचा वर्धापनदिन साजरा करण्यासोबतच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. परंतु, यावर्षी रंगभूमीदिनी दिवाळी असल्याने पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला असून, आता डिसेंबर महिन्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यात अभिनय क्षेत्रातील पुरु ष गटात दत्ता भट स्मृती पुरस्कारासाठी विजय साळवे यांची निवड झाली आहे. तर अभिनय क्षेत्रातील स्त्री गटात नंदा रायते यांना शांता जोग स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. दिग्दर्शन क्षेत्रात प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कारासाठी सुनील देशपांडे, लोक कलावंत क्षेत्रातील रामदास बरकले स्मृती पुरस्कारासाठी प्रकाश नन्नावरे, लेखन क्षेत्रातील नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार मनोहर शहाणे, प्रकाशयोजना गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार मुरलीधर तांबट, नेपथ्य रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार आनंद बापट यांना जाहीर झाला आहे. तर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजेश आहेर व डॉ. राजीव पाटील यांची विशेष योगदान पुरस्कार २०१८ साठी निवड करण्यात आल्याची माहिती नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे व खजिनदार ईश्वर जगताप यांनी यावेळी दिली.‘लोकमत’चे सुनील भास्कर यांना पुरस्कारअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा सांस्कृतिक पत्रकारिता जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक सुनील भास्कर यांना जाहीर झाला आहे. भास्कर हे स्वत: एक कलावंत असून, नाट्य समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
‘रंगभूमी दिन’ पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:58 PM