नाशिक : उमेदवारी अर्ज छाननीच्या दुसऱ्या दिवशी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या सत्ताधारी पॅनलकडून त्यांच्या पॅनलच्या नावाची ‘आपलं’ पॅनल म्हणून घोषणा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथे सत्ताधारी गटाचा शेतकरी व सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी देवीदास पिंगळे होते. मेळाव्यात देवीदास पिंगळे यांनी गेल्या पंधरा वर्षांत बाजार समितीत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. १७ वर्षांपूर्वी असलेले २५ लाखांचे वार्षिक उत्पन्न आजमितीस १३ कोटींचे झाल्याचे तसेच १ कोटींची मालमत्ता आजमितीस १ हजार कोटींची झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे त्वरित मिळावेत, म्हणून व्यापाऱ्यांकडून बॅँक गॅरंटी गोठविण्याचे धाडस केले होते. राज्य शिखर बॅँकेचे ७५ कोटींचे एकरकमी कर्ज फेडून बाजार समितीला शिखर बॅँकेच्या कर्जातून मुक्त केले आहे. आता शेतकऱ्यांनीच ठरवायचे आहे की, बॅँक गुंडांच्या हातात द्यायची की शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या संचालकांच्या हाती द्यायची. यावेळी युवराज कोठुळे,दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये,राजाराम धनवटे,प्रविण नागरे, शांताराम बागुल, पुरुषोत्तम कडलग, गणपत बोडके, लीलाबाई भुतावरे, कल्पना वाघ, हिरामण जाधव, भगवान जुंद्रे, समाधान बोडके,भास्कर गोडसे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सत्ताधाऱ्यांकडून ‘आपलं’ पॅनलची घोषणा
By admin | Published: June 27, 2015 12:28 AM