गंगापूर : मीडियाचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू प्रशासन अनुभवते. पत्रकारिता क्षेत्र ग्लॅमरस पण जबाबदारीचे आहे. बातमी मिळवून जबाबदारीने लिहावे लागते व तशी विश्वासार्हता पत्रकाराला मिळवावी लागते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जेएमसीटी पत्रकारिता अभ्यासकेंद्राच्या वार्षिक गुणगौरव व प्रायोगिक वृत्तपत्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.मुक्त विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरु प्रो. डॉ. ई. वायुनंदन, विभागीय संचालक डॉ. धनंजय माने, जेएमसीटीचे विश्वस्त रऊफ पटेल, साबीर खातीब, केंद्र संयोजक श्रीकांत सोनवणे उपस्थित होते.मान्यवरांनी मुक्त विद्या, नाशिक न्यूज या प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन केले. पुरुषोत्तम वानखेडे व नरेंद्र कलंकार या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘वक्ता मी होणार’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. बेस्ट मीडिया टीचर म्हणून सुमय्या जानोरकर यांचा सत्कार डॉ. वायुनंदन यांनी केला. डॉ. धनंजय माने, रऊफ शेख यांनी मुक्त विद्यापीठामुळे शिक्षणाची संधी तळागाळात उपलब्ध झाल्याचे सांगितले. प्रास्ताविक केंद्र संयोजक श्रीकांत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती पवार, भारत घाटोळ, गार्गी साळवे यांनी केले, तर आभार जगदीश बोडके यांनी मानले.
मुक्त विद्यापीठाचा वार्षिक गुणगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:20 AM