नाशिक : राज्य शिखर बॅँकेच्या सुमारे ७५ ते ८० कोटींच्या थकीत कर्जापैकी अवघे दहा ते बारा कोटींचे कर्ज शिल्लक असून, तेही १५ सप्टेंबरअखेर फेडण्यात आले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.नाशिक कृषी उत्पन्न समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या सभागृहात देवीदास पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बाजार समितीच्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे अहवाल वाचन सचिव अरुण काळे यांनी केले. बाजार समितीच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षात ११ कोटी ८७ लाख ९९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत बाजार समितीच्या वार्षिक उत्पन्नात दोन कोटींनी वाढ झाल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना देवीदास पिंगळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेच्या थकीत कर्जापैकी बहुतांश थकीत रक्कम फेडण्यात आली असून, येत्या १५ सप्टेंबर २०१४ अखेर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती राज्य शिखर बॅँकेच्या कर्जातून पूर्णपणे निरंक होणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. तसेच पेठ येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यादृष्टीने पेठ येथे दहा एकर जागेची शासकीय मोजणीही पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेस उपसभापती राजाराम धनवटे, संचालक तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, सुरेश गंगापुत्र, राजाराम फडोळ, अनिल बूब, चंद्रकांत निकम, बाळासाहेब पानसरे, भाऊसाहेब खांडबहाले. सौ. विमलबाई जुंद्रे यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष धर्मराज चौधरी, मधुकर कहांडळ, सुरेश सहाणे, कोंडाजी महाले, माधव पेखळे, अशोक राजोळे, धनाजी मते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सभा; पेठला लवकरच उपबाजार
By admin | Published: September 09, 2014 10:55 PM