नाशिक : वसंत व्याख्यानमालेची ९८वी वार्षिक सर्वसधारण बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेच्या माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी केला होता. परंतु, द्वारका परिसरातील संस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेला स्वत: जुन्नरेच उपस्थित राहिले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरून वसंत व्याख्यानमालेची सभा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना रविवारी (दि.२८) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी व्याख्यानमालेला महापालिकेने नाकारलेले अनुदान, श्रीकांत बेणी यांचे उपोषण, सभासदांनी देणगी द्यावी, तसेच त्यासाठी इतरांना आवाहन करावे आदी विषयांवर सदस्यांनी चर्चा करून सभा आटोपण्यात आली. नाशिक महानगरपालिका महासभेने मे २०१८ मध्ये झालेल्या व्याख्यानमालेसाठी दरवर्षाप्रमाणे तीन लाख रुपये अनुदान देण्याचा ठराव पारित केला होता. अनुदानासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासह संस्थेने महानगरपालिकेकडे सादर केली. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही शेरे मारून व्याख्यानमालेचे अनुदान नाकारले. त्यानंतर आलेले आयुक्त राधाकृष्ण गमे व्याख्यानमालेला अनुदान देतील अशी अपेक्षा होती. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले होते. अखेर या प्रश्नाची तड लावण्याकरिता संस्थेने उच्च न्यायालय, मुंबई यांच्यासमोर रिट पिटिशन दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने मे २०१९ मध्ये बहुसंख्य स्थानिक वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. दरम्यान, या संस्थेची २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण ६,८३, १८६ रुपये एवढा खर्च झाला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेस मुदत ठेवीवरील व्याज २,२७,५८९ रुपये आले, तर संस्थेस २,०६,१४४ रुपये एवढा तोटा झाला आहे़
वसंत व्याख्यानमालेची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:51 AM