लोहोणेर : वसाकाचा आगामी गळीत हंगाम चालू करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने थकित कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थता दाखविली असून, ३ आॅक्टोबर रोजी त्यावर निर्णय होणार आहे. त्यासाठी कारखान्याच्या सर्व घटकांनी संघटितरीत्या योगदान देण्याची गरज असल्याचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी बुधवारी (दि. ३०) वसाका कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात झालेल्या कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी जी . जी . मावळे होते. वसाकाची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कोणतीही वित्तीय संस्था ,खाजगी व्यक्ती कारखान्याला मदत करू शकलेली नाही. अथवा भाडेतत्वाने चालू करू शकलेली नाही. मात्र राज्य सहकारी बँकेने जुन्या कर्जाचे पुनर्घठन करून नव्याने अर्थसहाय्य देण्याचे मान्य केल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे सादर करण्यात आला असून ३ नोव्हेंबरला राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे. कारखाना गेल्या दोन वर्षांपासून सुरु होऊ शकलेला नाही, कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व कर्मचारी ,सभासद, ऊसउत्पादक शेतकरी यांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज असून जिल्हा सहकारी बँकेकडून आगामी काळात आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहू ,अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांनी यावेळी दिली.कारखान्याचा प्रशासकपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून कारखाना चालू करण्यासाठी प्रशासकीय स्थरावर प्रयत्न केल्याचे सांगत राज्य सहकारी बँकेकडे मध्यम, अल्पमुदत तसेच खेळते भागभांडवल उभे करण्यासाठी माजी अध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर, आमदार डॉ . राहुल आहेर यांच्या मदतीने राज्य सहकारी बँकेकडे प्रस्ताव सादर केले असून ३ नोव्हेंबरच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे ,अशी माहिती कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी जी. जी. मावळे यांनी यावेळी दिली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार, संचालक बाळासाहेब बिरारी, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे ,विलास सोनवणे यांनीही कारखाना चालू करण्यासाठी सर्व घटक त्यागाची भूमिका घेणार असल्याची ग्वाही देवून राज्य सहकारी बँकेनेही सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी केली. यावेळी माजी संचालक नारायण पाटील ,संतोष मोरे ,रामदास देवरे ,मधुकर पगार ,शांताराम जाधव ,वसंत निकम, अण्णा पाटील शेवाळे फुला जाधव उपसस्थित होते. (वार्ताहर)
वसाकाची वार्षिक सभा खेळीमेळीत
By admin | Published: October 01, 2015 12:15 AM