नाशिक : हैदराबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने ऑनलाईन बुकिंग केले. मात्र बुकिंग करताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्याचे बुकिंग होऊ शकले नाही. यामुळे ओझर विमानतळावर येत त्या प्रवाशाने येथे सेवा देणाऱ्या विमान उड्डाण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी त्यास दुसरे टिकीट काढण्यास सांगितले असता त्याने तिकीट न काढता हुज्जत घालून ओझर विमानतळावरील तिकीट काउंटर सोडले. येथून बाहेर पडल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात निनावी कॉल करून नाशिक वरून हैदराबाद येथे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले.
यानंतर ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक व नाशक पथकाला सोबत घेत ओझर विमानतळ गाठले सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या विमानातून खाली उतरून विमानाची तपासणी करण्यात आली. यावेळी विमानमध्ये कुठल्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रवाशाने हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आणि एक प्रकारे अफवा पसरविल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर या उच्चभ्रू प्रवाशाने ओझर येथून पळ काढला होता. पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक प्रवाशी काऊंटर वरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालताना दिसून आला यावरून प्रवासाचे वर्णन आणि त्याने ज्या मोबाइल क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केलेला होता तो क्रमांक पोलिसांनी ट्रॅक करून त्याला नाशिक शहरातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती त्याच्याविरुद्ध अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांकडून केले जात होते.
विमानामध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आलेले नाही प्रवाशांनी घाबरून न जाता अफवा पसरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे नाशिक ते हैदराबाद असे उड्डाण करणारे हे विमान रात्री अकरा वाजेपर्यंत विमानतळावरून टेक ऑफ झालेले न्हवते. सुरक्षिततेच्या कारणास्तव 'जीडीसीए'च्या गाईडलाईन प्रमाणे विमानाची सर्व प्रकारे तपासणी करून मग त्यानंतरच विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले