नाशिक : शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवारपाठोपाठ सोमवारीदेखील आयुक्तांनी बेड वाढविल्याने तीन दिवसांत ६३९ बेड उपलब्ध झाले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या महिन्यात तर रोजच बाधितांच्या संख्येचा उच्चांक होत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र महापालिका किंवा खासगी रुग्णालयात ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर्सचे बेडच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ५०४ बेड्स शनिवारी (दि. २७ मार्च) उपलब्ध करून दिले. सोमवारी बिटकोसह खासगी रुग्णालये मिळून जवळपास २३५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. येत्या दोन दिवसांत न्यू बिटको रुग्णालयात आणखी शंभर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी आणखी २३५ ऑक्सिजन बेड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 12:49 AM