नाशिक : शहरात आजमितीला अस्तित्वात असलेल्या साडेचारशेहून अधिक बगिच्यांमध्ये नव्या प्रारूप शहर विकास आराखड्यानुसार आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार आहे. गार्डन सिटीचे स्वप्न पाहणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गोदा पार्कबरोबरच बगिच्यांसाठीही जागांवर आरक्षण टाकण्यात आले असले तरी त्यातील ६४ आरक्षणे ही खासगी जागांवर असल्याने महापालिकेला त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी बगिचे साकारण्यात आले असले तरी काही मोजके बगिचे वगळता अन्य बगीच्यांची अवस्था देखभाल-दुरुस्तीअभावी बिकट बनलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उद्यानांच्या देखभालीचा ठेका संपुष्टात आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याअभावी उद्यानांतील झाडे वाळून गेलेली आहेत, तर अनेक ठिकाणी उद्यानांना कोणी वाली नसल्याने कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. शहरातील बव्हंशी उद्याने दम तोडत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला गार्डन सिटी बनविण्याचा विडा उचलला असून, त्यासाठी वनविभागाच्या नेहरू उद्यानात सुमारे २५ हेक्टर जागेवर वनौषधी उद्यान साकारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याशिवाय मध्यवस्तीतील शिवाजी उद्यानही महिंद्रा अॅण्ड महिंद्राला विकसित करण्यासाठी दिले जाणार आहे. शहरातील उद्यानांची स्थिती दयनीय असतानाच नव्या प्रारूप विकास आराखड्यात ७४ उद्यानांसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील फक्त दहा उद्यानांचे आरक्षण महापालिकेच्या मालकीच्या जागांवर आहे. मात्र, ६४ उद्यानांचे आरक्षण हे खासगी जागांवर टाकण्यात आल्याने महापालिकेला भविष्यात भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय आराखड्यात सार्वजनिक सुविधांसाठीही जागा आरक्षित करण्यात आल्याने त्यावरही बगिचे उभे राहू शकतात. त्यामुळे बगिच्यांच्या संख्येत भरच पडणार आहे. मात्र, बगिच्यांची संख्या वाढविताना त्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत उद्यान विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे. उद्यान विभागातील अंतर्गत वादाचा फटका उद्यानांच्या अस्तित्वावर होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
आणखी ७४ बगिच्यांची भर पडणार
By admin | Published: May 25, 2015 1:57 AM