नाशिक- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला एकेक धक्के बसण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार वसंत गीते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या पाठोपाठ महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असून आज सकाळी दिनकर पाटील यांनी त्यांची भेट घेतली ही भेट राजकीय प्रवेशासाठी नव्हती तर आपल्या संस्थेच्या शाळेच्या उदघाटनासाठी होती असा दावा दिनकर पाटील यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.
मात्र, पाटील हे भाजपा सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे. त्यामुळे गीते -बागुल यांच्यापाठोपाठ आता पाटीलही भाजपला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे
मुळात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी शहराध्यक्ष राहिलेले दिनकर पाटील हे बहुजन समाज पार्टी सह अनेक पक्ष फिरून भाजपात आले आहेत. 20 17 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागात भाजपाचे चारी सदस्य नगरसेवक त्यांनी निवडून आणले. मनपातील कामकाजाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना भाजपाने सभागृहनेतेपद देखील दिले. स्थायी समितीवर सदस्य म्हणून देखील दोन वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवड महापौरपदाच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्याआधी अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदार संघात देखील उमेदवारी देताना डावलण्यात आले होते त्याची परतफेड महापौर पदाच्या निवडणुकीत केली जाईल असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र तेथेही नाकारण्यात आल्याने पाटील नाराज होते. यातूनच ते आता शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा रंगली आहे.