इंदिरानगर : पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दाढेगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यानेे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. बिबट्याकडून जनावरे उचलून नेणे व ठार मारण्याच्या घटनाही घडत आहेत. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाढेगाव येथील एका शेतातील जनावराच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव करत वासरांवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात दोन वासरांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असताना रविवारी (दि. १३) पहाटे चार वाजेच्या सुमारास एका दुचाकीचालकाला बिबट्याने वाटेत दर्शन दिले होते. रविवारी (दि. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्रशेखर भोर आपल्या शेतातून रेशीम उद्योगाच्या शेतात जात असताना आंब्याच्या झाडाखाली बिबट्याने रुबाबदार बैठक मारल्याचे त्यांना दिसले. त्याला बघून चंद्रशेखर घाबरून आरडाओरड करत घराजवळ पळाले. बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वनरक्षकांनी पुन्हा एक पिंजरा लावला आहे.