नाशिक- अमेरिकेतून भारतात आलेल्या आणखी एका ४२ वर्षीय कोरोना संशयित रूग्णाला बुधवारी (दि.४) जिल्हा शासकिय रु ग्णालयात दाखल करण्यात आले.या संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
मुळचा नाशिककरर असलेला हा संशयित रूग्ण अमेरिकेत पर्यटनासाठी गेला होता. सात दिवसांपूर्वीच ते नाशिकमध्ये परत आले आहेत. मात्र, त्यांना मंगळवारी (दि.३) घसा दुखणे तसेच सर्दी असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या थुंकीचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याबाबत गुरूवारी (दि.५) अहवाल प्राप्त झाल्यावर कळेल असे शासकिय रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कोरोनाग्रस्त देशातून आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने कोरोनाचा संशयित म्हणून दाखल होणारा हा तिसरा रूग्ण आहे.
यापूर्वी इटली येथून आलेला २४ वर्षीय विद्यार्थी, इराणहून आलेला ४७ वर्षीय व्यक्ती यांना जिल्हा रूग्णालयात कोरोनाचे संशयित रूग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना आजार नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला होता. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच करोनाग्रस्त भागातून आलेल्या रु ग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.