गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवल्ली शिवारात रमेश बाळू मंडलिक (७०) या वृद्ध भूधारकाची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मालकीची कोट्यवधींची जमीन गिळंकृत करण्यासाठी भूमाफिया टोळीचा म्होरक्या मास्टरमाइंड रम्मी राजपूत याने कट रचून त्यांची जमीन हडपण्यासाठी मंडलिक यांचा काटा काढला. पोलिसांनी या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण २० संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महिन्यापासून फरार असलेल्या नीतेशच्या अटकेनंतर यात संशयितांची संख्या २० झाली आहे. राजपूत हा अद्याप फरार आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश शिंदे, हवालदार श्रीराम सपकाळ यांना नीतेश सिंग हा झारखंडच्या धनाबाद जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. यानुसार, त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना माहिती दिली. यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने नीतेशचा माग काढत त्यास शिताफीने अटक केली. त्याची नाशकात आणून पोलिसांनी कसून चौकशी केली असता मंडलिक खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील तपासाकरिता त्यास गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
भूमाफियांच्या टोळीतील अजून एक मासा गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:11 AM