-----------------------------------------------------------------------------
ओणे ते खेरवाडी रस्त्याची दुरवस्था
कसबे सुकेणे : प्रमुख जिल्हा मार्ग सुकेणे- सय्यद पिंपरी ते आडगाव या रस्त्याच्या ओणे शिवारातील वेताळबाबा मंदिर टप्प्याची अवस्था दयनीय झाली आहे. कसबे सुकेणेहून मौजे सुकेणे - ओणे - खेरवाडी चौफुली - सय्यद पिंपरी - आडगाव असा नाशिकला जाण्यासाठी प्रमुख जिल्हा मार्ग आहे. खेरवाडी चौफुला ते ओणे शिवारातील घुगे वस्तीपर्यंत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले; परंतु ओणे शिवार- वेताळबाबा मंदिर ते ओणे गाव यादरम्यानचे डांबरीकरण अपूर्ण असून, काही भागाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी मागणी परिसरातून होत आहे.
----------------
पीक कर्ज देण्याची शेतकऱ्यांची मागणी
कसबे सुकेणे : नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्जाचे वाटप करावे, अशी मागणी कसबे सुकेणेचे माजी सरपंच मधुकर पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, विविध आर्थिक महत्त्वपूर्ण कामे बाजूला ठेवून बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा मुदतीत केला आहे. जिल्हा बँकेच्या आश्वासनानुसार बँकेने शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे , अशी मागणी मधुकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.