मालेगाव : येथील एटीटी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रातील एका वर्गात प्रविष्ट असलेल्या २५ परीक्षार्थींपैकी केवळ २४ परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा केल्या. एक उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यामुळे पर्यवेक्षकासह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकेचा शोध घेण्यासाठी शिक्षकांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. येथील एटीटी महाविद्यालयाच्या केंद्रावर बारावीचे पेपर सुरू आहेत. गुरुवारी उर्दू विषयाचा पेपर झाला. या केंद्रावर ७०९ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. मंडळ सनियंत्रक (कस्टडियन) यांनी त्यानुसार प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रप्रमुखांकडे सुपूर्द केल्या. त्यानुसार प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा घेत असताना केंद्रावरील एका वर्गातील २५ विद्यार्थ्यांपैकी केवळ २४ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जमा झाल्या. एक उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची बाब शुक्रवारी शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर केंद्राध्यक्षासह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. शिक्षकांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची गंभीरबाब लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गहाळ झालेली उत्तरपत्रिका शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत तसेच याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल अशी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बोळवण केली. (प्रतिनिधी)
उत्तरपत्रिका गायब
By admin | Published: March 04, 2017 12:58 AM