नाशिक : येवला तालुक्यातील मौजे डोंगरगाव शिवारातील शेतामध्ये नर काळविटास जाळ्याच्या (वाघूर) साहाय्याने पकडून दगडाने ठार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ११) उघडकीस आला. वनविभागाच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरले आहे.येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर राखीव संवर्धन वनक्षेत्र काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. या वनातील काळवीट परिसरातील भटकंती करत असतात. डोंगरगाव शिवारात शेतीमध्ये काळवीटची शिकार जाळे लावून निर्घृणपणे करण्यात आल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संजय भंडारी, वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, विलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार फरार झालेआहेत.मधुकर शिवाजी पवार (रा. बिलवणी, ता. वैजापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. पवारविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये येवला वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-१मधील संरक्षित वन्यप्राणी आहे. या प्राण्याच्या हत्येचा गुन्हा अजामीनपात्रआहे.
डोंगरगावात काळविटाची शिकार; साथीदार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 1:08 AM