नाशिक : भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची-1मध्ये संरक्षित असणाऱ्या काळवीट वन्यजीवाची नांदगाव वनपरिक्षेत्रात बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाशिक पूर्व वनविभागाच्या नांदगाव रेंजच्या गस्ती पथकाने दोघा शिकाऱ्यांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नर काळवीटचे मुंडके, काही मांस, बंदूक, जिवंत काडतुसे, सर्च लाईट, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील येवला, नांदगाव तालुक्यातील राखीव वनांमध्ये काळवीट या वन्यजीवांचा वावर आढळून येतो. धोक्याच्या प्रजातींपैकी एक प्रजाती असलेल्या काळवीटचे संवर्धन नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील वनांमध्ये होत असताना मालेगाव, नांदगाव, देवळा तालुक्यातील काही शिकारी रात्रीच्यावेळी दुचाकी, चारचाकीने काळविटांची शिकार करण्यासाठी भटकंती करतात.
दरम्यान, शनिवारी (दि.11) मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जामदरी ते पांजण रस्त्यावर नांदगाव वनपरिक्षेत्त्राचे गस्तीपथकाला दोन इसम एका दुचाकीवर संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. पथकाने ना थांबवण्याचा प्रयत्न केला असता यांनी तुझा की वरून सुसाट धूम ठोकली यावेळी वन विभागाच्या पथकाने सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करून रात्रीच्या अंधारात दोघांनाही ताब्यात घेतले. हिरो होंडा दुचाकीला (एमएच41 झेड 6847) एक सर्च लाईट लावलेला असल्याचे लक्षात येताच पथकाचा संशय अधिक बळावला.
दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्याजवळ असलेल्या नायलॉनच्या पिशव्यांची झडती घेतली असता, त्यामधून एका नर काळविटाचे धारधार हत्याराच्या सहाय्याने तोडलेले मुंडके व पाय तसेच दुसऱ्या पिशवीत मांसाचे तुकडे मिळून आले. तसेच धारधार सुरे, तीन कटर, 5 जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक बंदूक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित मुदस्सीर अकिल अहेमद (रा.चुनाभट्टी, मालेगाव), जाहिदअख्तर शाहिद अहेमद (रा.अहेमदपुरा, मालेगाव) अशी अटक केलेल्या दोघा शिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध वन विभागाने वन्यजीव शिकारिचा गुन्हा नोंदविण्यात आला.
शिकाऱ्यांना पाच दिवसांची वनकोठडी
दोघांना नांदगाव न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नर काळवीट भारतीय वन्यजीव संरक्षण (1972) अधिनियमांतर्गत सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या अनुसूची-भाग1चा वन्यप्राणी आहे. त्यामुळे त्याची शिकार या कायद्याच्या विविध कलमान्वये करण्यास बंदी असून किमान 7 वर्षे कारावास व कायद्याने हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने न्यायालयाने दोघांनाही येत्या 15 तारखेपर्यंत वनकोठडी सुनावली.
दोघांपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरुद्ध असा गुन्हा दाखल आहे. काळवीट शिकार हा अजामीनपात्र गुन्हा असून यामध्ये शिकारी आणि त्याच्याकडून मांस खरेदी करणाऱ्याना गंभीर शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्याचा सखोल तपास केला जात असून शिकाऱ्यांची पाळंमुळं उखडून फेकण्यात येतील. - डॉ.सुजीत नेवसे, सहायक वनसंरक्षक, नाशिक पूर्व वनविभाग