गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत गेली असली तरी त्यानंतर हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरात सिरो सर्वेक्षण करून शहरातील नागरिकांमध्ये सामूहिक प्रतिकार शक्ती किती प्रमाणात निर्माण झाली आहे, हे तपासण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार ९ ते ११ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. के.वाय.येळीकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचे निष्कर्ष महापालिकेने जाहीर केले आहेत. या तपासणीमध्ये अठरा वर्षावरील एकूण २ हजार ३५५ नागरिकांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले होते. शहरातील एकूण तपासलेल्या नमुन्यांपैकी ३९.५० टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरूद्ध प्रतिपिंड (अँटीबॉडी) आढळून आल्या. त्यातही झोपडपट्टी क्षेत्रात ४२.०७ तर बिगर झोपडपट्टी क्षेत्रात ३९.१२ टक्के इतके प्रमाण आहे. शहरातील सिडको विभागामध्ये सर्वात जास्त म्हणजेच ४२.६६ टक्के तर नाशिक पूर्व विभागात ४२.०७ टक्के इतके प्रतिपिंड होण्याचे प्रमाण आहे. इतर विभागांमध्ये ३४.३१ ते ३९.०१ टक्के इतके प्रमाण आले.
झोपडपट्टी भागात ३१ ते ४० वर्ष या वयोगटात ४५.०८ टक्के व बिगर झोपडपट्टी भागात ६१ ते ७० वर्ष या वयोगटात ४४.५७ टक्के असे सर्वात जास्त प्रमाणात प्रतिपिंड (अँटीबॉडी) आढळून आल्या. अँटीबॉडी आढळलेल्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण ३९.९५ तर महिलांचे ३९.१३ टक्के प्रमाण आढळले.
इन्फो..
प्रतिपिंड होण्याचे अकुशल कामगारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण ४५.२१ टक्के असून डॉक्टर, वकील, प्राध्यापक व्यावसायिकांमध्ये सर्वात कमी म्हणजे ३१.६७ टक्के इतकेच प्रमाण आढळले आहे. एकूण अँटीबॉडी आढळलेल्या व्यक्तींमध्ये ७८.८१ टक्के व्यक्तींचा कोणत्याही कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याचा पूर्व इतिहास नव्हता तर १५.१५ टक्के व्यक्ती कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या होत्या व ५.०५ टक्के व्यक्तींना कुठलाही इतिहास आठवत नाही.
नमुने घेतलेल्या एकूण २ हजार ३५५ पैकी ९९६ रूग्ण म्हणजेच ४२.२९ टक्के इतक्या प्रमाणात नागरिकांमध्ये कोरोना आजाराची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
....इन्फो...
ही सामूहिक प्रतिकार शक्ती नाही.
या अहवालामध्ये कोविड संदर्भात प्रतिपिंड (अँटीबॉडी) प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्याचे आढळले असले तरी सामान्यत: ७० टक्के प्रतिपिंड असल्याचे आढळले असते तर त्यास सामूहिक प्रतिकार शक्ती म्हणता आले असते. परंतु अशी स्थिती नसल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.