सातपूर: शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम सुरूच असून, मंगळवारी (दि.२२) सातपूर परिसरातील श्रमिकनगर, शिवाजीनगर, गंगापूरगाव भागातील वाढीव बांधकामे महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई केली. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचे अतिक्र मण विरोधी पथक पोलिसांच्या फौजफाट्यासह थेट श्रमिकनगर येथे पोहोचले. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, महेंद्र पगारे, नगररचना विभागाचे शाखा अभियंता ललित भामरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्रमिकनगर येथील तीन घरांचे अनधिकृत वाढीव बांधकामे हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर शिवाजीनगर येथील रस्त्याच्या सामासिक अंतरात उभारण्यात आलेली पत्र्याची टपरी हटविण्यात आली. गंगापूर गावातील रस्त्याच्या कडेला असलेले हॉटेल आणि आजूबाजूचे वाढीव पत्र्याचे शेड हटविण्यात आले. भोसला मिलिटरी महाविद्यालयालगतचे अतिक्र मण हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. सदर मोहीम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. या मोहिमेत सिडको, सातपूर विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
सातपूरला अतिक्रमणविरोधी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:34 AM