नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडालगत चोवीस वर्षांपूर्वी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्यास महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी विरोध दर्शविला असून, महापालिकेची वास्तू पाडण्याचा निर्णय कुणालाही सभागृहाबाहेर बैठकीत घेता येणार नाही, असा टोला पालकमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.मागील आठवड्यात सिंहस्थाच्या आढावा बैठकीत आखाडा परिषदेचे कथित अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी पर्वणीकाळात साधू-महंतांना स्नानासाठी अडथळा ठरू नये यासाठी वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्याची सूचना केली होती. त्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही चर्चा न करता वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते; मात्र पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. वस्त्रांतरगृहात सेवा देणाऱ्या पुरोहित संघाने या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला, तर सेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने कोणत्याही स्थितीत वस्त्रांतरगृह पाडू देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. शासनाला नवनिर्माण करता येत नसेल, तर किमान आहे ती वास्तू पाडण्याचे पाप करू नका, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. आता या वादात महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी उडी घेतली असून, त्यांनी वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोध दर्शविला आहे. बडगुजर यांनी सांगितले, वस्त्रांतरगृह ही महापालिकेच्या मालकीची वास्तू आहे आणि ती पाडण्याचा निर्णय कुणीही असा परस्पर बैठकीत घेऊ शकत नाही. तो अधिकार महापालिकेच्या सभागृहालाच आहे. महापालिकेच्या सभागृहात तसा ठराव झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. सभागृहाबाहेर होणाऱ्या कोणत्याही निर्णयाला काहीही अर्थ नाही. सदर इमारत जनतेच्या करातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे वस्त्रांतरगृह पाडू दिले जाणार नसल्याचेही बडगुजर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोधी
By admin | Published: January 15, 2015 12:06 AM