मालेगाव : सोयगाव भागातील शांतिनगर, जयरामनगर, सप्तशृंगी पार्क या भागातील सूर्यवंशी लॉन्स या मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये वाजणाºया डीजे व कर्कश वाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या विशेष पोलीस पथकाने शनिवारी (दि.१२) ध्वनिप्रदूषण करणारा डीजे व वाद्य साहित्य जप्त केले आहे. मालेगावात ध्वनिप्रदूषण विरोधातील ही पहिलीच कारवाई झाल्याने डीजे चालकांचे धाबे दणाणले आहे. सोयगाव सबस्टेशन रोडवरील सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय थेट नागरी वसाहतीत आले आहे. ध्वनिप्रदूषण व वाहतूक समस्या यामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास होतो. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार देवीदास निकम, पोलीस शिपाई नीतेश खैरनार, अभिजित साबळे, नवनाथ सूर्यवंशी आदींच्या पथकाने घटनास्थळी डीजेची ध्वनिपातळी नोंदवली. पोलिसांच्या कारवाईचा अंदाज आल्याने पोलीस पोहोचण्याआधीच डीजे व वाद्य बंद करण्यात आले होते; मात्र मंगलाष्टके सुरू होण्याआधी गाणे वाजविण्यात आले. त्याची ध्वनिपातळी ११३ डेसिबेल नोंदवली गेली. पोलिसांनी पाटणे येथील भैरवनाथ बँण्ड पार्टीचा हा डीजे व वाद्यवृंद जप्त केला आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत ही पहिलीच कारवाई झाली आहे.
ध्वनिप्रदूषण करणारा डीजे, वाद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:57 AM