नाशिक : आता अवघ्या ४५ रुपयांनाा मिळत असलेल्या अँटिजेन किटची ५०४ रुपयांना यापूर्वी खरेदी करण्यात आल्याने प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यामुळे स्थायी समितीत त्यावर प्रश्नही करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत ९० लाख रुपयांच्या किट खरेदीला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दरात इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत असताना त्यावर प्रशासनाला उत्तर न घेताच हा विषय का मंजूर करण्यात आला यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक शुक्रवारी (दि. १) स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अँटिजन टेस्ट किट खरेदीसाठी ९० लाख रुपयांना कार्योत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, खरेदीवरून संशयाचा धूर निघू लागल्याने त्यावरून बरीच भवती न भवती सुरू झाली. समीना मेमन आणि सलीम शेख यांनीही प्रश्न विचारले खरे, मात्र सभापती गणेश गीते यांनी कोरोनाकाळात खबरदारी नको का, असा प्रश्न करीत हा विषय मंजूर केला.
दरम्यान, सातपूर विभागातील प्रभाग ८ व ९ तसेच १० व २६ मधील मलनि:सारण व्यवस्थेची दुरुस्ती, पंचवटी विभागातील प्रभाग १ व ३ मधील गटार लाइनची देखभाल व दुरुस्ती व अशोका मार्गालगत वाहणाऱ्या पावसाळी नाल्यात आरसीसी पाइप लाइन टाकणे, आनंदवल्ली शिवाय संत कबीरनगर येथील रस्ते कॉंक्रिटीकरण यांसह विविध कोट्यवधी रुपये किमतीच्या कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नगरसेवक सुधाकर बडगुजर, सलीम शेख, राहुल दिवे, प्रतिभा पवार, समिना मेमन उपस्थित होत्या. नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रभाग २३ मध्ये अशोका मार्गालगत वाहणाऱ्या पावसाळी नाल्यात आरसीसी पाइप स्ट्राॅम वॉटर ड्रेन टाकण्याच्या कामावर आक्षेप नोंदवत नैसर्गिक नाला पाइप लाइन टाकून बंद करता येतो का, असा प्रश्न उपस्थित करत या कामाची निविदा प्राकलन दरापेक्षा ८.४३ टक्क्यांनी जादा असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले.