देवळा : शेतीमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांसह बाजार समितीतील मापारी, हमाल आदींची बाजार समितीमार्फत मोफत अँटिजन किट पुरविण्यात येऊन कोविड चाचणी करण्यात आली. शेतकरी वर्गास शेतीमाल विक्री करतांना येणारी कोविड चाचणीची अडचण दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र बाजार समितीतील लिलाव प्रक्रियेमुळे संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी देवळा बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी लिलावानंतर आवाराचे निर्जंतुकीकरण करणे, मास्कचा नियमित वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाजार आवारात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आल्यामुळे शेतकरीवर्गांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास अडचणी येत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून बाजार समितीने मोफत रॅपिड अँटिजन किट उपलब्ध करून दिले. तालुका आरोग्य विभागाच्या पथकामार्फत देवळा येथे शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन मार्केट आवारात मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती केदा आहेर, सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते.आरोग्य विभागाने सोमवारी कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण देत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर अँटिजन चाचणीची सुविधा पुरविण्यास असमर्थता दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना कोरोना केअर सेंटरवर चाचणीसाठी जावे लागले होते. शुक्रवारीदेखील आरोग्य विभागाचे कर्मचारी उशिरा आले. यामुळे शेतकरी, बाजार समितीतील हमाल, मापारी यांना तिष्ठत राहावे लागून लिलावानंतर मालाचे वजन व माल खाली करण्यास खोळंबा झाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.--------------देवळा बाजार समितीत शेतीमाल लिलाव सोमवारपासून सुरळीतपणे सुरू आहेत. यापूर्वी कोविड चाचणी केली असेल त्यांनी चाचणी अहवाल सोबत ठेवावा. शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेली नाही त्यांना विनामूल्य कोविड टेस्टची सुविधा पुरविण्यात येत आहे.- केदा आहेर, सभापती, देवळा बाजार समिती
देवळा बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 5:30 PM