सिन्नर : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतल्याची माहिती अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
सोमवारपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोना प्रतिबंधक औषधी देऊन त्यास होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी अनेक नातेवाईक येतात, ते कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रुग्णास भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नातेवाइकाची रॅपिड अँटिजन टेस्ट करूनच त्यांना रुग्णालयाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. हा उपक्रम रोज राबविण्यात येणार असून, त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास आळा बसणार आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना पीपीई किट परिधान करूनच पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाॅर्डमध्ये प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. अनेकदा काही जण कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पीपीई किट परिधान न करताच पाॅझिटिव्ह वाॅर्डमध्ये वावरतात.
-----------------
कोरोनाला आळा घालणार
बऱ्याचदा पीपीई किट घातले तरी नाका, तोंडावर मास्क व्यवस्थित लावत नाहीत. परिणामी, या वाॅर्डातूनच त्यांना कोरोनाचा कळतनकळत संसर्ग होतो. हे लोक तशाच अवस्थेत घर गाठून इतरांनाही बाधित करतात. कोरोना स्प्रेडर ठरणाऱ्या या मंडळींचा बिनदिक्कतपणे सुरू असलेला वावर कमी करण्यासाठी, तसेच महामारीच्या काळात आरोग्याबाबत असलेला हलगर्जीपणा दूर करण्यासाठी डाॅ. लहाडे यांनी रुग्णांच्या नातलगांची अँटिजन टेस्ट करूनच त्यांना रुग्णालयाबाहेर सोडण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. कोरोनाचा प्रसार जलद गतीने होतोय. तो थांबविण्यासाठी सर्व कोरोना रुग्णालयांत हा उपक्रम राबविल्यास कोरोनाचा प्रसार होण्यास आळा बसण्यास मदत होईल.
फोटो ओळी- सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी आलेले नातलग रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांची अँटिजन टेस्ट करताना अधीक्षिका डाॅ. वर्षा लहाडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी.