नाशिक : चेन्नईला झालेल्या ‘आयटीएफ ओपन’ राष्ट्रीय ट्रायथलॉन खुल्या स्पर्धेमध्ये नाशिकची अनुजा उगलेने पुन्हा दमदार कामगिरीची नोंद करीत द्वितीय स्थान पटकावत नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. अनुजाने यापूर्वीदेखील राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक वेळा बाजी मारली आहे.
चेन्नईत ही स्पर्धा रविवारी सकाळी पार पडली. या स्पर्धेत स्पर्धकांना सर्वप्रथम १.५ किमी पोहणे, त्यानंतर ४० किलोमीटर सायकलिंग आणि अखेरीस १० किलोमीटर धावणे हे तिन्ही प्रकार सलगपणे करायचे असतात. मुलींच्या १८ वर्षांवरील गटात नाशिकच्या अनुजाने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ३ तास २ मिनिटांचे टायमिंग देत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्याच मानसी मोहिते हिने २ तास ५९ मिनिटे अशी वेळ देत अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, मुलांच्या गटात अनुज उगलेदेखील दमदार कामगिरी करीत होता. मात्र मधल्या सायकलिंगच्या टप्प्यात अनुज याची सायकल पंक्चर झाल्याने तो मागे पडल्याने त्याला स्पर्धा अर्धवट सोडून द्यावी लागली. या स्पर्धेसाठी दोन्ही स्पर्धकांना त्यांचे आजोबा अनिल उगले यांचे आणि महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद कुमार तसेच सचिव आणि जलतरण प्रशिक्षक राजेंद्र निंबाळते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
फोटो
२६अनुजा