रामकुंडातील पाणी कमी झाल्याने नाराजी
नाशिक : रामकुंड, गांधी तलाव येथील पाणी कमी झाले असल्याने या ठिकाणी धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्याला वास येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून पाणी बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
व्यावसायिकांच्या ऑनलाइन सेवांना प्रतिसाद
नाशिक : गतवर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यावसायिकांनी आपली ऑनलाइन सेवा सुरू केली असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइनमुळे ग्राहकांना घराबाहेर जाण्याची गरज पडत नाही. किराणासह बहुतेक वस्तू घरपाेच मिळत असल्याने या सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे रिक्षाचालक अडचणीत
नाशिक : मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक रिक्षाचालक त्रस्त झाले असून त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल दरवाढ, प्रवासी बसविण्यावर असलेले निर्बंध यामुळे दिवसभर रिक्षा चालवूनही रोजगार मिळत नसल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी नेहमी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम केलेले आहे. त्यात उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता खूपच अरुंद होतो. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पुन्हा कामाचा ताण वाढला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना सलग दोन ड्युट्या कराव्या लागत असल्याने हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
गल्लीबोळातील दुकाने उशिरापर्यंत सुरू
नाशिक : रात्री सात वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले असले तरी अनेक गल्लीबोळातील दुकाने उशिरापर्यंत सुरू असतात. यामुळे या परिसरात गर्दी होते. यातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती स्थानिक रहिवाशांमध्ये व्यक्त केली जात असून उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना समज देण्याची मागणी करण्यात येत आहे.
वसुली मोहिमेमुळे वीज ग्राहकांत नाराजी
नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुली मोहीम सुरू असून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक नागरिकांना थकबाकी भरण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हॉटेल व्यावसायिक अडचणीत
नाशिक : गतवर्षापासून घोंघावणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले असून अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी व्यवसाय सावरण्यास सुरुवात होत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.