सारांश
कोणतीही दुर्घटना पूर्वसूचना देऊन घडत नाही हे खरे; परंतु अशा घटनांना मुख्यत्वे मानवी चुकाच कारणीभूत असतात हेदेखील तितकेच खरे. व्यवस्थांमध्ये मात्र कौतुकाला स्वतःस पात्र धरून चुकांसाठी दुसऱ्यांकडे अगर कनिष्ठांकडे बोट दाखविण्याची प्रथा असल्याने अप्रिय घटनांसाठीचा दोष दुसऱ्याच्या माथी मारण्याचे प्रयत्न केले जातात. बेफिकिरीबरोबरच संवेदनहीनता उघड करणाऱ्या अशा घटनांबद्दलची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे असते; पण ते तितक्याशा गांभीर्याने होताना दिसत नाही. भंडाऱ्यात प्रारंभी तेच झाले व नाशिक महापालिकेतील तसेच शिरसगाव आरोग्य केंद्रात अलीकडेच घडलेल्या घटनांप्रकरणीही तेच होताना दिसावे हे दुर्दैवी आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत निष्पाप, निरागस बालकांचा बळी गेल्यावर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व प्रत्येक ठिकाणच्या इलेक्ट्रिकल व फायर ऑडिटचा विषय चव्हाट्यावर आला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणाही आउटडेटेड असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले. नवजात बालक कक्ष व प्रसूती कक्षातील फायर एक्सटिंग्विशरची मुदत संपुष्टात येऊन आठ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने धावपळ करून दुसऱ्याच दिवशी ही यंत्रणा बदलली गेली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांचेही फायर ऑडिट सुमारे दोन वर्षांपासून झाले नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले. नाशिकमधील केवळ ४२ शाळांनी आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली.
यंत्रणांची बेफिकिरी तर यात आहेच आहे, शिवाय संवेदनाही किती बोथट झाल्या आहेत त्याचीही उदाहरणे कमी नाहीत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रात अलीकडेच घडलेली घटना या संदर्भात पुरेशी बोलकी आहे, तेथे एकाच दिवसात चाळीस भगिनींवर कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया करून त्यांना त्यांच्या लहानग्या बाळांसह एकाच खोलीत चक्क जमिनीवर झोपविले गेले. निवासाची व अंथरूणाची पुरेशी व्यवस्था नव्हती तर उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवशी इतक्या शस्रक्रिया करून झेंडे गाडणे गरजेचे होते काय, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. थंडीच्या दिवसात घरून आणलेल्या किरकोळ अंथरूणावर या भगिनी आपल्या तान्हुल्यासह जमिनीवर झोपल्या हे किती अमानवीय, निष्ठुर आहे; पण यंत्रणेत काम करणाऱ्यांची मानसिकता इतकी निबर झाली आहे की त्यांना जराही हळहळ वाटली नाही. तेव्हा प्रश्न हा यंत्रणेत बळावत चाललेल्या या संवेदनहीनतेचा आहे.
नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग लागल्याने त्याचाही मोठा गहजब सध्या सुरू आहे. दुर्घटना कुठलीही असो, त्याचे राजकारण करता येऊ नये; पण या आगीवरही आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रथेप्रमाणे चौकशी समितीही नेमली गेली आहे, तिचे अहवाल काय यायचे ते येतील व बड्यांना बचावून तत्सम लोकांवर कारवायांचे सोपस्कर पूर्ण केले जातील; पण घटना घडून गेल्यावर याकडे लक्ष देण्याऐवजी यासंबंधीची जबाबदारी असणाऱ्या पर्यवेक्षकीय अधिकाराच्या व्यक्तींकडून अगोदरच का काळजी घेतली जात नाही हा खरा प्रश्न आहे. यंत्रणांमधील शीर्षस्थ नेत्यांनी या निमित्ताने गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवणे गरजेचे आहे.खासगीला वेठीस धरतात, मग स्वतःचे काय?अग्निशमन यंत्रणा वगैरे बाबींसाठी सरकारी व निमसरकारी यंत्रणांकडून खासगी आस्थापनांना नेहमीच वेठीस धरले जाते. मध्यांरी याच संदर्भाने खासगी रुग्णालयांच्या मागे ससेमिरा लावला गेला होता व भंडावून सोडले गेले होते; पण त्याच नियम निकषांचे खुद्द सरकारी रुग्णालयांमध्ये वा कार्यालयांमध्ये मात्र पालन होत नसल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान व स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशीच ही अवस्था आहे. दुसऱ्यांचा छळ करताना स्वतःच्या उणिवांकडेही लक्ष दिले गेले तर भंडाऱ्यासारख्या घटना घडणार नाहीत.