अभोणा : शहरात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य खात्याने कंबर कसली आहे.शासन निर्देशानुसार कोरोना बाबत जनजागृती करणे, प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, प्रतिबंधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, विवाह व धार्मिक कार्यक्रम नियंत्रित करणे. यासाठी कळवण पंचायत समितीमार्फत विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.अभोण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव, सोनाली कोल्हे, सुरेश येवला, ज्योती जाधव, चंद्रकला चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभोणा शहरातील राम गल्ली व भवानी पेठेत कोरोना संसर्गित दहा रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दवाखाने, मेडिकल, जीवनावश्यक वस्तू या अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच सुनीता पवार, उपसरपंच भाग्यश्री बिरारी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शहराच्या मुख्य बाजार पेठेसह इतर सर्व भागात शुकशुकाट दिसला.
अत्यल्प प्रतिसाद ;वाढत्या कोरोना संसर्गास पायबंद घालण्यासाठी आरोग्य खात्याने अभोणा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना डेडिकेटेड हेल्थ सेंटर मध्ये व्यावसायिकांनी आपली कोरोना (अँटिजेन) तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले होते. त्यासाठी ३०० लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या ४६ लोकांनी कोरोना (अँटिजेन) तपासणी करुन घेतली. त्यात ११ कोरोना संसर्गित सापडले असून यातील काही रूग्णांना येथील कोरोना सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे, तर काही नाशिकला जाऊन उपचार घेणार असल्याचे समजते. दरम्यान, ही तपासणी मोहीम सोमवारपासून जोमाने सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक बहिरम, डॉ. पुरुषोत्तम खंबाईत यांनी सांगितले. अँटिजेन तपासणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रकाश आहेर. सहायक राकेश भामरे, कोविड टेक्निशियन मयूर पवार, आनंद जाधव, तुकाराम बागुल आदी करीत आहे.