दंडात्मक कारवाईत झाली वाढ
नाशिक : प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता दंडात्मक कारवाई वाढविण्यात आली आहे. विनामास्क वावरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाला दरवाढीने भुर्दंड
नाशिक : वाढत्या उष्म्यामुळे बाजार समितीत भाजीपाला पिकांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. आवक कमी झाली असल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
विक्रेत्यांकडून डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
नाशिक : बाजारामध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेक विक्रेते अगदी जवळ जवळ दुकाने लावत असल्याने या विक्रेत्यांच्या दुकानांवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होते. डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरात घुमतोय सायरनचा आवाज
नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढल्याने शहरात दिवसभर विविध मार्गांवर रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज येऊ लागले आहेत. दिवसभर रुग्णवाहिका या रुग्णालयातून त्या रुग्णालयात रुग्णांना घेऊन जात असल्याचे दिसते. या आवाजामध्ये अधूनमधून पोलीस गाडीच्या सायरनचाही आवाज घुमत असतो.
सिग्नल बंद : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील फेम चौकातील सिग्नल यंत्रणा मागील चार-पाच दिवसांपासून बंद असून, या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करून झाडाखाली बसून राहात असल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
खोदलेल्या रस्त्यांचा ज्येष्ठांना त्रास
नाशिक : शहरातील बहुतेक उपनगरांमध्ये महापालिकेने विविध कामांसाठी रस्ते खोदले आहेत. यामुळे या परिसरांमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामीण भागात चिंता
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत गावकारभाऱ्यांकडून नियोजन केले जात असून, नागरिकही दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचा शेतीकामांवरही परिणाम होऊ लागला आहे.
कमी दरामुळे शेतकऱ्यांत नाराजी
नाशिक : किरकोळ बाजारात गहू २२ ते २५ रुपये किलो दराने विकला जात असला तरी शेतकऱ्यांना मात्र तो हमी भावापेक्षाही कमी दराने विकावा लागत आहे. खुल्या बाजारात गहू १६०० पासून सरासरी १७५० रुपयांपर्यंत विकला जात आहे.