नाशिक : मुंबई येथीलअॅपॅक छायाचित्र इन्स्टिट्यिूटच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘फोटो फ्राय’ खुल्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी पटकाविले. सुमारे ३५० छायाचित्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.कला, छायाचित्र, साहसी क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारी मुंबई येथील एपीएसी छायाचित्र इन्स्टिट्यूटच्या वतीने चौथी फोटोफ्राय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती व या स्पर्धेची विभागणी कुटुंब, अन्न, सण-उत्सव अशा तीन गटांत करण्यात आली होती. यामध्ये खरोटे यांनी कुटुंब व सण-उत्सव या गटांत सहभाग घेतला होता. खरोटे यांनी कुटुंब गटात एका मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या कुंभाराच्या भावीपिढीदेखील त्याच कामात मग्न असल्याचे चित्र टिपले होते. या छायाचित्रात त्या कुंभाराचे संपुर्ण कुटुंब पारंपरिक कामात व्यस्त असल्याचे भाव झळकत होते.
गंगापूर गावाच्या शिवारात टिपलेल्या या छायाचित्राने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच तीस-या सण-उत्सव गटात कावनई तीर्थक्षेत्रावर पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या छायाचित्राने तृतीय व त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाच्या छायाचित्राला उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षीस मिळाले. एकूणच दोन गटात प्रथम, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकावर खरोटे यांनी वर्चस्व राखले. मुंबई येथील पीरामल कला दालनात झालेल्या समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून विभागीय व्यवस्थापक ईशाक दर, निमेश मेवाडा, सिनेअभिनेत्री शाश्वती पिंपलीकर, महिला छायाचित्रकार सबा गाझीयानी, व्यवस्थापकीय संचालक विनायक पुराणिक, संचालक अर्चना जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. खरोटे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खरोटे यांच्या छायाचित्रांना विविध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झाले असून काही दिवसांपुर्वी त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचा टिपलेला चंपाषष्ठीच्या उत्सवाच्या छायाचित्राला जागतिक स्तरावर ‘विकिलव्ह मॉन्युमेंट’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.