पळसे : पळसे गाव बंगालीबाबा येथील नासाका कारखाना रस्त्यावरील सरोदे मळा येथे गुरुवारी सकाळी वानराच्या जोडीने रस्त्यावरच ठाण मांडल्याने तासभर रस्ता वाहतुकीने बंद झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.नासाका रस्त्यावरील सरोदे मळा येथे गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शाळेत जाणारे विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांची नेहमीप्रमाणे ये-जा सुरू होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यांच्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, पादचारी कसरत करत मार्गक्रमण करत होते. यावेळी अचानक काळ्या तोंडाच्या व लांबलचक शेपटी असलेल्या वानराच्या जोडीने रस्त्याच्या मधोमध ठाण मांडले. त्यामुळे येणारे-जाणारे हबकून गेले होते. काही दुचाकीस्वारांनी गाडी हाकण्याचा प्रयत्न केला असता वानर अंगावर धावून जात असल्याने दुचाकीचालकांची धावपळ उडाली होती. त्यामुळे अनेक पादचारी वाहनधारक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांब उभे राहून वानराची गम्मत पाहत होते. वानराच्या जोडीने रस्त्यावरच ठाण मांडल्याचे समजल्याने आजूबाजूचे रहिवासी बघण्यासाठी येत होते. सकाळी साडेसात वाजेपासून तास-सव्वा तास वानरराजांच्या जोडीने रस्त्यात ठाण मांडल्याने वाहतूकदेखील थांबली होती. साडेआठच्या सुमारास रस्त्यावर वानरराजांची जोडी उड्या मारत निघून गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)
वानरांनी मांडला रस्त्यावर ठिय्या; नागरिक भयभीत
By admin | Published: September 23, 2016 1:19 AM